Tuesday, April 22, 2014

रशियन सॅलड

समर सॅलड करायचं म्हणून घरी बरीचशी फळं आणली होती. पण पेरू आणि संत्री वेळेवर मिळाली नाहीत म्हणून नुसतीच फळं कापून खाल्ली. फळं ताजी असतानाच संपवायची म्हणून फळ घातलेलं सॅलड.

वेळ:-
पंधरा मिनिटं

वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे

साहित्य:-
  1. साल काढून दोन सेमी घनचौरस तुकडे केलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे
  2. एक सफरचंद - दोन सेमी घनचौरस तुकडे केलेले
  3. एक कप स्वीटकॉर्नचे दाणे
  4. एक कप ताजे मटारदाणे
  5. मूठभर कोथिंबीर
  6. दोन चमचे मेयॉनीज
  7. दोन थेंब मस्टर्ड सॉस
  8. चवीपुरतं मीठ
  9. अर्धा चमचा साखर
  10. मिरपूड
  11. दोन चमचे दूध


कृती:-
  1. सालं काढून झाल्या झाल्या बटाटे उकळत्या पाण्यात टाकावेत, इतर भाज्या चिरून होईपर्यंत ते शिजतात. शिजवताना बटाटे खूप कच्चे राहू नयेत किंवा अगदी लगदाही होऊ नयेत इतपत शिजवावेत. उकडलेले बटाटे नीट निथळून घ्यावेत.
  2. स्वीटकॉर्न बटाट्यासोबत/ मायक्रोवेव्ह मध्ये उकडून घ्यावेत. 
  3. दोन चमचे शिगोशिग भरून मेयॉनीज एका बोलमध्ये घ्या. त्यात ताजी मिरपूड, मीठ, साखर, मस्टर्ड सॉस व दोन चमचे दूध घाला. दुधामुळे ड्रेसिंग खूप कोरडं वाटणार नाही.
  4. उकडलेला बटाटा, स्वीटकॉर्न, गाजर, मटारदाणे व कोथिंबीर एका बोलमध्ये एकत्र करा
  5.  ड्रेसिंग सर्व बाजूंनी लागेलसं हलक्या हाताने मिश्रण चांगलंच ढवळा.
  6. दोन तास रेफ्रिजरेट करा आणि ताव मारा.



भोपळी मिरच्या आणि दह्यातली मिरची

मला दह्यातली मिरची मरणाची आवडते. पराठ्यांबरोबर खायला किंवा तशीच खायला सुद्धा. मिरची खूपच तिखट असेल तर अगदी हाय-हुय करायला लावते. पण दही आणि मिरचीचा स्मोकी फ्लेवर हे जीवघेणं मिश्रण आहे हे माझं अगदी ठाम मत आहे.

लागणारा वेळ:-
पंधरा मिनिटे

वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे

साहित्य:-
  1. हिरवी-लाल-पिवळी भोपळी मिरची (कोणतेही दोन रंग, प्रत्येकी एक हवाच. त्यातही हिरवा नसेल तरी चालेल) बारीक चिरलेली
  2. पाच सहा बेबी कॉर्न - गोल चकत्या कापून
  3. एक गाजर - साधारण मिरच्यांइतक्याच आकाराचे तुकडे केलेलं
  4. एक काकडी- साधारण मिरच्यांइतक्याच आकाराचे तुकडे केलेली
  5. दोन छोट्या/एकच मोठी हिरवी मिरची (ही प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे घ्यावी)
  6. टांगलेलं दही
  7. मिरपूड
  8. चवीपुरतं मीठ
  9. मूठभर कोथिंबीर
  10. अर्धा चमचा साखर / उभे काप केलेले चार खजूर

कृती:-
  1. हिरवी मिरची थेट गॅसवरती खरपूस भाजून घ्या. करपायला नको पण छान भाजली जायला हवी.
  2. एका बोलमध्ये टांगलेलं दही, मीठ,  साखर, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्या.
  3. सर्व भाज्या (साखर वगळली असेल तर खजूरासह) एका बोलमध्ये घ्या व त्यावर हे ड्रेसिंग ओता.
  4. हवं असेल तर रेफ्रिजरेट करा नाहीतर थेट खायला घ्या.

Monday, April 21, 2014

बेबी कॉर्न सॅलड विथ बेक्ड बीन्स & हनी लेमन ड्रेसींग

सॅलडमध्ये रंगांची विविधता आणावी तितके ते रूचकर होत जाते. निरनिराळे रंग येताना तितक्याच चवीदेखील घेऊन येतात. आंबट-गोड चवीची सॅलडस मला विशेषकरून अधिक आवडतात.

लागणारा वेळ-
भाज्या कापायला- पाच ते दहा मिनिटं
प्रत्यक्ष सॅलड बनवण्यास लागणारा वेळ - दोन ते तीन मिनिटं.

वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे

साहित्य:-
  1. दोन मोठ्या पळ्या भरून बेक्ड बीन्स
  2. आठ-दहा मध्यम फरसबीच्या शेंगा (फ्रेंच बीन्स) [ जून किंवा अतिच कोवळ्या नसाव्यात]
  3. एक गाजराचे दोन सेमी X दोन सेमी आकाराचे क्यूब्ज
  4. एक हिरवी भोपळी मिरची दोन सेमी X दोन सेमी आकाराच्या तुकड्यांत कापून
  5. बेबी कॉर्न्स हव्या त्या आकारात कापून (गोल चकत्या अथवा लांबट अर्धे तुकडे)
  6. एक टोमॅटो  दोन सेमी X दोन सेमी आकाराच्या तुकड्यांत कापून (माझ्याकडच्या बेक्ड बीन्स आधीच टोमॅटो सॉसमध्ये असल्याने मी इथे वापरला ना्हीय)
  7. अर्धा चमचा तेल
कृती:
  1.  एका पातळ बुडाच्या भांड्यात बेक्ड बीन्स उच्च आंचेवर भराभर अर्ध्या मिनिटापुरते परतले. परतताना त्यात थोडीशी काळी मिरी पावडर घातली. व ते थंड होण्यासाठी एका बोलमध्ये काढून ठेवले.
  2. त्याच भांड्यात नंतर फ्रेंच बीन्स(फरसबी) अर्धा चमचा तेलावर उच्च आंचेवर एक मिनिटभर परतली. त्यात थोडा चवीपुरता मॅगी मॅजिक मसाला, शाही पनीर मसाला आणि जिरेपूड, चिमूटभर लाल तिखट घातलं. थंड होण्यासाठी बेक्ड बीन्सच्या बोलमध्ये फरसबी काढून ठेवली.
  3. एका मोठ्या बोलमध्ये भोपळी मिरची, गाजर, बेबी कॉर्न यांचे तुकडे घेतले. त्यात चवीपुरते मीठ (बेक्ड बीन्समध्येही मीठ असते, त्यामुळे थोडे कमीच मीठ घातलेले योग्य), एक चमचा मध व अर्धे लिंबू पिळून घातले. पुन्हा थोडी मिरीपावडर घातली. व सगळे मिश्रण हलक्या हाताने हलवून घेतले
  4. थंड झालेली फरसबी व बीन्स वरील मिश्रणात घालून पुन्हा मिश्रण नीट ढवळून घेतले. बीन्स आधीच बेक्ड आणि त्यात पुन्हा परतलेले असल्याने ते मोडू नयेत याची काळजी घ्यावी लागते.
  5. एक दोन तास रेफ्रिजरेट केल्यानंतर खायला घ्यावे, तो पर्यंत सगळ्या चवी छान मुरतात.

 

ब्रोकोली सॅलॅड

पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच. थोड्या ट्रायल-एरर नंतर ही पाककृती सध्या बरी वाटतेय.
सर्वसाधारण स्वयंपाकात सतत तंतोतंत मापं असू शकत नाहीत. जिथे शक्य आहेत, तिथं दिली आहेत. नाहीत तिथं मात्र आपल्या आपल्या मगदुराप्रमाणं किती-काय-कसं हे थोडंसं आपलं आपणच उमजून घ्यावं हे उत्तम.

लागणारा वेळ
जास्तीत जास्त २० मिनिटे, भाज्या कापून तयार असल्यास पाच मिनिटांहूनही कमी.

वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे

साहित्य:-
  1. तर एक लहानसा ब्रोकोलीचा गड्डा. दुकानात मिळतो साधारण तेवढा एक. 
  2. एक ते दीड वाटी उभा चिरलेला कोबी
  3. एक वाटी ताज्या पनीरचे साधारण एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  4. एक ते दीड वाटी गाजराचेही एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  5. मूठभर पार्सली
  6. हवे असल्यास कोवळी पालकाची पाच-सहा पाने 
  7. दोन-तीन बदाम
  8. एक  बारीक कापलेली हिरवी मिरची
  9. पाच-सहा खजूरांचे उभे कापलेले तुकडे
  10. अर्धा चमचा तेल (शक्यतो ऑलिव्ह ऑईल)
  11. आठ-दहा मधोमध कापलेली काळी द्राक्षे/ मनुका (वैकल्पिक)
ड्रेसिंग
  1. एक वाटीभर टांगलेलं दही. (यासाठी रात्रभर टांगायचीही गरज नाही. स्वयंपाकास सुरूवात करण्याआधी एका चहाच्या गाळणीत दही ठेवून ते गाळणं एका वाटीभर ठेवून द्या. अतिरिक्त पाणी खाली वाटीत जमा होईल.)
  2. काळं मीठ
  3. अर्धा-पाऊण चहाचा चमचा साखर
  4. काळी मिरी
  5. मस्टर्ड सॉस
कृती-
  1.  ब्रोकोली सोडून इतर भाज्या, मिरची व खजूरचे तुकडे कापून तयार ठेवले.
  2. ब्रोकोली अशीच खायला चांगली लागत नाही. त्यामुळे मी सहसा ब्रोकोलीचे तुरे मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर ठेवून खायला घेते. या वेळेस अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये गॅस हायफ्लेम वरती ठेवून दीडेक मिनिट चटचट भाजून घेतली व थंड होण्यासाठी बाजूला ठेवली.
  3. एका लहान कुंड्यात/बोलमध्ये पाणी काढलेले दही फेटून घेतले
  4. दह्यात मीठ+साखर+मस्टर्ड सॉस घातले*. त्यातच काळी मिरीची पावडर पेपर मिलमधून अगदी ताजी ताजी घातली. सर्व मिश्रण पुन्हा एकदा फेटून घेतले.
  5. थंड झालेली ब्रोकोली, पार्सली व इतर भाज्या+खजूर इ.वर हे ड्रेसिंग ओतले
  6. हलक्या हाताने भाज्या वरखाली करून सर्व ठिकाणी हे ड्रेसिंग नीट लागेल हे पाहिले.
  7. सलाद तयार.
     
 

 टीप:-
  1. *दह्यात थोडीशी पुदीन्याची पाने देखील चुरून घालता येतील.
  2. द्राक्षे घातल्याने चव आणखीच वाढते. दाताखाली खजूर किंवा द्राक्ष आलं की मस्त वाटतं.
  3. फ्रीजध्ये साधारण एक तासभर ठेवल्यास सलाद चांगले मुरते व दही ड्रेसिंग+मिरचीची चव छान जमून येते.
  4. गॅस किंवा स्टोव्हशिवाय स्वयंपाक करायचा असल्यास हा प्रकार अगदी उत्तम. 
  5. दही आणि पनीरमधून  मिळणारे बी१२, तसेच ब्रोकोलीचा कर्करोगाशी लढा देण्याचा गुणधर्म हा या पाककृतीचा मुख्य घटक मानला जाऊ शकेल.
  6. शक्यतो ताजी मिरीपावडर वापरावी, चवीत नक्कीच फरक पडतो. त्यसाठी हे उपकरण उपयुक्त ठरावं.