Tuesday, April 22, 2014

भोपळी मिरच्या आणि दह्यातली मिरची

मला दह्यातली मिरची मरणाची आवडते. पराठ्यांबरोबर खायला किंवा तशीच खायला सुद्धा. मिरची खूपच तिखट असेल तर अगदी हाय-हुय करायला लावते. पण दही आणि मिरचीचा स्मोकी फ्लेवर हे जीवघेणं मिश्रण आहे हे माझं अगदी ठाम मत आहे.

लागणारा वेळ:-
पंधरा मिनिटे

वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे

साहित्य:-
  1. हिरवी-लाल-पिवळी भोपळी मिरची (कोणतेही दोन रंग, प्रत्येकी एक हवाच. त्यातही हिरवा नसेल तरी चालेल) बारीक चिरलेली
  2. पाच सहा बेबी कॉर्न - गोल चकत्या कापून
  3. एक गाजर - साधारण मिरच्यांइतक्याच आकाराचे तुकडे केलेलं
  4. एक काकडी- साधारण मिरच्यांइतक्याच आकाराचे तुकडे केलेली
  5. दोन छोट्या/एकच मोठी हिरवी मिरची (ही प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे घ्यावी)
  6. टांगलेलं दही
  7. मिरपूड
  8. चवीपुरतं मीठ
  9. मूठभर कोथिंबीर
  10. अर्धा चमचा साखर / उभे काप केलेले चार खजूर

कृती:-
  1. हिरवी मिरची थेट गॅसवरती खरपूस भाजून घ्या. करपायला नको पण छान भाजली जायला हवी.
  2. एका बोलमध्ये टांगलेलं दही, मीठ,  साखर, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्या.
  3. सर्व भाज्या (साखर वगळली असेल तर खजूरासह) एका बोलमध्ये घ्या व त्यावर हे ड्रेसिंग ओता.
  4. हवं असेल तर रेफ्रिजरेट करा नाहीतर थेट खायला घ्या.

1 comment:

  1. swati,
    khoop masta blog chalu kela ahes. apan tar aajpasun tuza pankha zalo.

    ReplyDelete