Monday, April 21, 2014

ब्रोकोली सॅलॅड

पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच. थोड्या ट्रायल-एरर नंतर ही पाककृती सध्या बरी वाटतेय.
सर्वसाधारण स्वयंपाकात सतत तंतोतंत मापं असू शकत नाहीत. जिथे शक्य आहेत, तिथं दिली आहेत. नाहीत तिथं मात्र आपल्या आपल्या मगदुराप्रमाणं किती-काय-कसं हे थोडंसं आपलं आपणच उमजून घ्यावं हे उत्तम.

लागणारा वेळ
जास्तीत जास्त २० मिनिटे, भाज्या कापून तयार असल्यास पाच मिनिटांहूनही कमी.

वाढणी:-
दोन माणसांसाठी एका वेळचे पोटभर खाणे

साहित्य:-
  1. तर एक लहानसा ब्रोकोलीचा गड्डा. दुकानात मिळतो साधारण तेवढा एक. 
  2. एक ते दीड वाटी उभा चिरलेला कोबी
  3. एक वाटी ताज्या पनीरचे साधारण एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  4. एक ते दीड वाटी गाजराचेही एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  5. मूठभर पार्सली
  6. हवे असल्यास कोवळी पालकाची पाच-सहा पाने 
  7. दोन-तीन बदाम
  8. एक  बारीक कापलेली हिरवी मिरची
  9. पाच-सहा खजूरांचे उभे कापलेले तुकडे
  10. अर्धा चमचा तेल (शक्यतो ऑलिव्ह ऑईल)
  11. आठ-दहा मधोमध कापलेली काळी द्राक्षे/ मनुका (वैकल्पिक)
ड्रेसिंग
  1. एक वाटीभर टांगलेलं दही. (यासाठी रात्रभर टांगायचीही गरज नाही. स्वयंपाकास सुरूवात करण्याआधी एका चहाच्या गाळणीत दही ठेवून ते गाळणं एका वाटीभर ठेवून द्या. अतिरिक्त पाणी खाली वाटीत जमा होईल.)
  2. काळं मीठ
  3. अर्धा-पाऊण चहाचा चमचा साखर
  4. काळी मिरी
  5. मस्टर्ड सॉस
कृती-
  1.  ब्रोकोली सोडून इतर भाज्या, मिरची व खजूरचे तुकडे कापून तयार ठेवले.
  2. ब्रोकोली अशीच खायला चांगली लागत नाही. त्यामुळे मी सहसा ब्रोकोलीचे तुरे मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर ठेवून खायला घेते. या वेळेस अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये गॅस हायफ्लेम वरती ठेवून दीडेक मिनिट चटचट भाजून घेतली व थंड होण्यासाठी बाजूला ठेवली.
  3. एका लहान कुंड्यात/बोलमध्ये पाणी काढलेले दही फेटून घेतले
  4. दह्यात मीठ+साखर+मस्टर्ड सॉस घातले*. त्यातच काळी मिरीची पावडर पेपर मिलमधून अगदी ताजी ताजी घातली. सर्व मिश्रण पुन्हा एकदा फेटून घेतले.
  5. थंड झालेली ब्रोकोली, पार्सली व इतर भाज्या+खजूर इ.वर हे ड्रेसिंग ओतले
  6. हलक्या हाताने भाज्या वरखाली करून सर्व ठिकाणी हे ड्रेसिंग नीट लागेल हे पाहिले.
  7. सलाद तयार.
     
 

 टीप:-
  1. *दह्यात थोडीशी पुदीन्याची पाने देखील चुरून घालता येतील.
  2. द्राक्षे घातल्याने चव आणखीच वाढते. दाताखाली खजूर किंवा द्राक्ष आलं की मस्त वाटतं.
  3. फ्रीजध्ये साधारण एक तासभर ठेवल्यास सलाद चांगले मुरते व दही ड्रेसिंग+मिरचीची चव छान जमून येते.
  4. गॅस किंवा स्टोव्हशिवाय स्वयंपाक करायचा असल्यास हा प्रकार अगदी उत्तम. 
  5. दही आणि पनीरमधून  मिळणारे बी१२, तसेच ब्रोकोलीचा कर्करोगाशी लढा देण्याचा गुणधर्म हा या पाककृतीचा मुख्य घटक मानला जाऊ शकेल.
  6. शक्यतो ताजी मिरीपावडर वापरावी, चवीत नक्कीच फरक पडतो. त्यसाठी हे उपकरण उपयुक्त ठरावं.


1 comment: